‘गोकुळ’च्या सत्तासंघर्षातून २०२९ च्या सत्तांतराची नांदी? सतेज पाटील नेमकं काय म्हणाले?

गोकुळ दूध संघातील संचालक नियुक्ती आणि चेअरमन निवडीवरून कोल्हापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘कोल्हापूर संघर्ष मोर्चा’ आणि निषेध सभेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकार आणि महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. गोकुळमधील सत्तासंघर्ष हा केवळ एका दूध संघापुरता मर्यादित नसून सहकार आणि लोकशाही वाचवण्याची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार असून त्याची सुरुवात कोल्हापूरच्या भूमीतून झाली आहे, असा राजकीय इशाराही त्यांनी दिला.

या सभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम, ऋतुराज पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले की, एका बाजूला तीन मंत्री, दोन खासदार आणि अनेक आमदारांची फौज होती, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानाची लढाई लढणारे कार्यकर्ते होते. राजू शेट्टी, गणपतराव पाटील आणि सत्यजित पाटील यांच्यासह अनेकांनी संघर्षाच्या काळात साथ दिली. आपल्या पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. प्रत्येक तालुक्यात जाऊन दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या भेटी घेतल्या. तब्येत बरी नसतानाही २२ दिवस अँटिबायोटिक्स घेऊन प्रचार केला. मात्र, ही लढाई स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी नव्हे, तर साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

'गोकुळसाठी सरकारने स्वतंत्र कायदा केला'

गोकुळवर प्रशासक नियुक्त करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कायद्यावर सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. गोकुळवर प्रशासक आणू नये म्हणून न्यायालयीन लढाई लढावी लागली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन प्रशासक नियुक्तीला आव्हान दिले आणि त्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला, असे त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत निवडणुका होईपर्यंत जुन्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची भूमिका सरकारने घेतली. मात्र, गोकुळच्या बाबतीत वेगळा कायदा करण्यात आला. सरकारची ही दुहेरी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

'मुश्रीफ आणि चंद्रकांत दादांचे षडयंत्र'

गोकुळमध्ये चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याच्या निर्णयावरून सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. या दोघांमुळेच चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय झाला असून लोकशाही आणि सहकार संपवण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. जीआरमधील चार नावांचा उल्लेख करत त्यांनी नियुक्त्यांवर आक्षेप घेतला. शिवाजी दिनकर अडनाईक, डॉक्टर प्रवीण चंद्र हेंद्रे, कृष्णा ज्ञानदेव पाटील आणि सांगलीतील ॲडव्होकेट प्रशांत पाटोळे यांची नावे त्यांनी सभेत वाचून दाखवली. विशेषतः सांगलीतील व्यक्तीला गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त केल्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

'कोल्हापूर जिल्ह्यात एकही पात्र माणूस मिळाला नाही का? एकही दूध उत्पादक मिळाला नाही का? गोकुळचे दूध संकलन १० ते १२ लाख लिटरच्या वर असताना या जिल्ह्यातून एकही माणूस मिळू नये, यासारखे दुर्दैव नाही,' अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

'गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याचा डाव'

गोकुळच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करताना सतेज पाटील यांनी गुजरातमधील सरदार पटेल मिल्क फेडरेशनचा संदर्भ दिला. देशातील छोट्या दूध संघांना एकत्र आणून दूध संकलन वाढवण्याची योजना असल्याचा दावा त्यांनी केला. या फेडरेशनच्या माध्यमातून भविष्यात अमूल आणि मदर डेअरी या दोनच मोठ्या ब्रँडचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे गोकुळसारख्या स्थानिक दूध संघांचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. 'गोकुळ हा कोल्हापूरच्या मालकीचा राहिला पाहिजे, अमूलच्या मालकीचा होता कामा नये,' अशी भूमिका त्यांनी मांडली. महानंदा दूध संघाचा एनडीडीबीशी असलेला संबंध आणि इतर दूध संघांबाबत सुरू असलेल्या हालचालींचाही त्यांनी उल्लेख केला.

'सहकार मोडून काढण्याचे काम सुरू'

कोल्हापूर जिल्ह्याचा सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक वारसा सांगताना त्यांनी रत्नाप्पा कुंभार, सदाशिवराव मंडलिक, तात्यासाहेब कोरे, पी. एन. पाटील यांच्यासह अनेक सहकार नेत्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. या नेत्यांनी सहकार वाढवला आणि जोपासला. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून सहकार मोडून काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गोकुळमधील चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. चेअरमन निवडीच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या १२ संचालकांना सहभागी होऊ द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या निवड प्रक्रियेला कोरमची आवश्यकता नसल्याचा कायदेशीर दावाही त्यांनी मांडला.

'मी इगोइस्टिक माणूस नाही, समोरून लढणारा आहे'

गोकुळच्या निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्र येऊन दूध उत्पादकांच्या हितासाठी कारभार करावा, अशी भूमिका आपण घेतली होती, असे सतेज पाटील यांनी सांगितले. काही संचालकांनी आपल्याला फोन करून त्यांच्या नेत्यांशी बोलण्याची विनंती केली होती. त्यानंतर आपण सर्व नेत्यांशी संवाद साधला. २९ तारखेच्या बैठकीला १२ संचालकांना पाठवा आणि बहुमताच्या आधारे चेअरमन निवड होऊ द्या, अशी विनंती केली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. 'मी इगोइस्टिक माणूस नाही. मी समोरून लढणारा माणूस आहे. तलवार हातात घेतली तर समोरून लढतो. तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत नाही,' अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

'गोकुळची लढाई महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची सुरुवात'

भाषणाच्या अखेरीस सतेज पाटील यांनी गोकुळच्या संघर्षाला महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडले. या मोर्चाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख करत सामान्य माणसांमध्ये अन्यायाविरोधात लढण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे ते म्हणाले. 'गोकुळच्या निमित्ताने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. सामान्य माणसांना आता वाटायला लागले आहे की, लढलो तर आपण जिंकू शकतो,' असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, 'या कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाची बीजे रोवली गेली आहेत. २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार आहे. या परिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरच्या भूमीतून झाली आहे.' 'तुम्ही आमची कळ काढली, आम्ही तुमची कळ काढलेली नाही. सुरुवात तुम्ही केली आहे, आता ती समाप्त आम्ही करणार,' असा इशाराही त्यांनी दिला.

भाषणाच्या शेवटी 'याचना नाही, रण होईल. रण असे होईल, पुन्हा कधी नसेल असे होईल,' असा निर्धार व्यक्त करत त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रच्या घोषणेने भाषण संपवले.

गोकुळच्या संचालक नियुक्त्या आणि चेअरमन निवडीवरून सुरू झालेला संघर्ष आता सहकाराच्या स्वायत्ततेचा आणि राज्यातील राजकीय वर्चस्वाचा मुद्दा बनला आहे. या संघर्षाच्या माध्यमातून २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची राजकीय दिशा ठरवण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी आपल्या भाषणातून केल्याचे दिसून आले.

Satej Patil, Gokul Dairy Controversy, Kolhapur Sangharsh Morcha, Gokul Milk Union, Jayant Patil, Raju Shetti, Hasan Mushrif, Chandrakant Patil, Amul Dairy, Maharashtra Politics, Cooperative Sector, Gokul Directors Appointment, Maharashtra Political News, 2029 Maharashtra Elections

Leans left of center
1 outlet covering this story
No AI summary generated for this bucket yet.
1 Article
- ‘गोकुळ’च्या सत्तासंघर्षातून २०२९ च्या सत्तांतराची नांदी? सतेज पाटील नेमकं काय म्हणाले?Max MaharashtraLean Left
Discussion (0)
- No comments yet — be the first to weigh in.